🍏'आवळा' एक अमृतफळ...
'सी' व्हिटॅमिन ने भरपूर असणाऱ्या आवळ्याचे असंख्य गुणधर्म असल्यामुळे आवळ्याला 'अमृत फळ' असे म्हणणे अगदी योग्य ठरते.
आपल्याकडे आवळ्याचे मुख्य दोन प्रकार आढळतात.पहिला म्हणजे डोंगरी आवळा जो औषधी असतो, आणि दुसरा म्हणजे राय आवळा.
आयुर्वेदामध्ये डोंगरी आवळ्याचे महत्व आहे.कदाचित आवळा हे एकमेव फळ असावे की ज्याचे कुठल्याही स्वरूपात सेवन केले तरी त्याचे औषधी गुणधर्म अजिबात कमी होत नाहीत.
आवळ्यातील व्हिटॅमिन 'सी'मुळे शरीरातील पांढऱ्या पेशी वाढण्यासाठी मदत होते.
*आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या पांढऱ्या पेशींवर अवलंबून असते.
आयुर्वेदामध्ये आवळा अनेक प्रकारे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.जसे कच्चा आवळा, मोरावळा, चूर्ण, च्यवनप्राश, मुरांबा, कँडी आणि याशिवाय आपण घरी आवळ्याची चटणी, लोणचं, आवळा सुपारी, पेठा देखील करून खात असतो.*
अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये आवळ्याचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो.कारण आवळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.आवळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी इतके पोषक घटक असतात की ते इतर कुठल्याही फळामध्ये आढळून येत नाहीत.आवळ्यामध्ये असणाऱ्या या पोषक घटकांमुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात आणि शरीर शुद्धीकरणासाठी (detox) मदत होते.
आयुर्वेदामध्ये आवळ्याचे अनेक औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत जसे की- पित्तशामक, केशवर्धक, निरोगी केस आणि त्वचेसाठी, शक्तिवर्धक आणि काही ठिकाणी डायबिटीस, कॅन्सर सारख्या आजारांवरील औषध-उपचारांमध्ये देखील आवळ्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियमचे प्रमाण असल्याने त्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.हाडांच्या समस्यांवरील औषधांमध्ये आवळ्याचा उपयोग केला जातो.
डोळ्यांच्या अनेक विकारांवर जसे मोतीबिंदू, कमी दिसणे यावर ईलाज करण्यासाठी जी औषधे वापरली जातात त्यामध्ये आवळ्याचा वापर होतो.शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल दूर करून हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यात आवळा मदत करतो.
जरी आवळ्याचे अनेक औषधी गुणधर्म असले तरी त्याचा उपयोग किंवा सेवन हे तज्ञ डॉक्टरांच्या / वैद्याच्या सल्ल्यानुसारच करावे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा