झोपेचा सौदा
मित्रांनो, नेटफ्लिक्स आज उघडपणे म्हणतंय की त्यांची स्पर्धा माणसाच्या झोपेशी आहे... तो जितका कमी झोपेल आणि नेटफ्लिक्स बघण्यात वेळ घालवेल तितकं बरं..!
खरंतर नेटफ्लिक्सने हे उघडपणे सांगितलं इतकंच बाकी अमेझॉन, हॉटस्टार यांचीही स्पर्धा झोपेशीच आहे... इतकंच कशाला या सगळ्या आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म आधी आलेल्या युट्युबनेही न बोलता कायम आपल्या झोपेशी स्पर्धा केली आहे...
फेसबुकही तेच करतंय. झोपेतून उठत नाही तोच फेसबुक आणि व्हाट्सअप उघडणारे अनेकजण आहेत... मध्यरात्री अचानक उठून फेसबुक व व्हाट्सअप बघणार्यांची आणि मग त्याच तंद्रीत परत झोपणार्यांची संख्या वाढतेय...
`रात्री झोपताना तरी किमान फोनचा डाटा बंद केला पाहिजे हा विचार आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे...`
रोजचा दीड-दोन जीबी डाटा ही स्वस्ताई नाहीये, त्या दीड-दोन जीबीसाठी आपण झोपेच्या निमित्ताने प्रचंड मोठी किंमत चुकती करतो आहोत... _ज्याचा संबंध थेट आपल्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक आरोग्याशी आहे..._ आपल्याला आभासी जगात एखादी गोष्ट स्वस्तात किंवा फुकट मिळते म्हणजे ती खरोखर फुकट नसते... फेसबुक वापरण्याचे खिश्यातून पैसे आपण देत नाही. नेटफ्लिक्स वापरण्याचे जे पैसे देतो त्याच्या कितीतरी पट अधिक मनोरंजन आपल्या हातात असतं, ज्यामुळे ते जवळपास फुकट आहे असं आपल्याला वाटत असतं... पण आधुनिक काळात, आभासी जगाच्या दुनियेत बाजार निराळ्या पद्धतीने पैशांची वसुली करत असतो... `इथे कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही...` `स्वस्तातही मिळत नाही...`
प्रत्येक गोष्टीची किंमत असते. मनोरंजन अधिकाधिक व्यक्तिकेंद्रित बनत चाललंय कारण सध्या सौदा आपल्या झोपेचा आहे...
मित्रांनो, आपण जितके कमी झोपणार, डिजिटल माध्यमातून मनोरंजन देणार्या कंपन्या तितक्याच मोठ्या होत जाणार, हे भयंकर आहे आणि अस्वस्थ करणारं आहे... `प्रत्येकजण बोली लावतोय, माणसांची झोप कमी व्हावी यासाठी...`
तेंव्हा मित्रांनो, आपल्या झोपेचा सौदा किती होऊ द्यायचा याचाही ज्याने त्याने विचार करण्याची वेळ आली आहे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा