!!! मधुराद्वैताचार्य गुलाब महाराज !!!
भाग - २०.
अशाप्रकारे महाराजांनी देवांच्या श्लोकांना उत्तर दिल्यावर, देवांना आलेले भरते इतके अनावर झाले की, ते बिछायतीवरून एकदम उठून महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांचे चरणावर आपल्या अश्रूंनी अभिषेक करू लागले. महाराज त्यावेळी जेवण्यास सोवळ्यात बसले होते. आणि देव अंगावरच्या कपड्यासहित जाऊन महाराजांचे पाय धरले होते. विटाळ केल्याबद्दल महाराज एकही शब्द न बोलता त्यांना पाय सोडण्याबद्दल महाराजांनी खूप आग्रह केला. पण देवांनी पाय सोडले नाही.
शेवटी महाराज म्हणाले, चिंता करू नका. तुमचे सर्व अपराध क्षमा झाले आहेत. सर्व काही चांगले होईल. तेव्हाच त्यांनी पाय सोडले.
त्यानंतर महाराजांनी कुणबी भाषेत रुख्मीणी स्वयंवर गायले. ते इतके रंगले की, श्रोते आपले देहभान विसरून गेले.
महाराजांचा सहवास सर्वांनाच हवाहवासा वाटू लागला. कोणाला अलौकिक, कोणाला लौकिकाने माधुर्य संप्रदायानुसार श्रीकृष्ण पत्नीत्वामुळे उपासना मार्गही विशेष रितीने महाराज चालवत होते. कार्तिक शुद्ध बारा, या दिवशी घरोघरी तुळशी विवाह होत असतो. महाराजही हा उत्सव अपूर्व रीतीने करत असत. स्वतःला वधू व श्रीकृष्णाला वर कल्पुन काही लोकांना व स्त्रियांना वधू पक्षा कडे व काही पुरुष व स्त्रियांना वर पक्षाकडे ठरवायचे. विवाह विधीप्रमाणे स्वतःचे कन्यादान करवून श्रीकृष्णाशी विवाह करायचा. हा समारंभ मोठा मनोरंजक होत असे. या वर्षी श्रीनिवास शास्त्री वधू पक्षाकडून आणि वसंत कृष्णाराव ठोंबरे वर पक्षाकडून होते.
महाराजांची नित्य दिनचर्या मोठी अपूर्व व चमत्कारिक असायची. त्यांचे शास्त्रावरील नित्य नवीन निरुपणे, भजने, भजनाच्या वेळी गोड कवणे, हा तर एक मोठा चमत्कार असून त्यांच्या दैवी सामर्थ्याचा दर्शकच होता. मधून मधून त्यांचे योगबल व अधिकारत्वही त्यांच्या सहवासातील लोकांच्या अनुभवास येत असे.
कधी कधी महाराज स्वतःबद्दल अलौकीक माहिती सांगायचे. ते म्हणत, माझे गाव केशवपुरी. हे गाव बद्रीनारायणाच्या पलीकडे फार दूर आहे. तिथे भूगर्भातून जावे लागते. मी तुम्हाला तिथे नेऊ शकतो. जाताना तुम्हाला खाण्यापिण्याची किटकिट करायची गरज नाही. ठिकाणावर आपोआप सगळी व्यवस्था होत जाईल. वरच्या कलकी रस्त्याने व्यासांचे पुराण सांगण्याचे ठिकाण प्रसिद्ध आहे. त्या रस्त्याने गेले की, प्रत्यक्ष व्यास पुराण सांगताहेत असे तुम्हाला दिसेल. शिवाय अनेक ऋषींचे दर्शन हे होईल. परंतु तुमचा तेवढा अधिकार नसल्यामुळे त्यांच्याशी संभाषण करू शकणार नाही. तो अधिकार प्राप्त होण्यासाठी मी सांगेन त्या ठिकाणी तुम्हाला काही दिवस तप करावे लागेल.
केशवपुरीचे वर्णन तर महाराज फारच विलक्षण करीत असत. ऐकणाऱ्याच्या मनात अतिशय उत्सुकता, जिज्ञासा निर्माण होत असे.लोक विचारायचे ही माहिती कोणत्या ग्रंथात मिळेल? महाराज म्हणाले, केशव पुरीत असे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. महाराजांनी सांगितलेली ही माहिती ऐकल्यावर, व्यास ऋर्षीच्या दर्शनाची तीव्र अभिलाषा त्यांच्या मनात जागृत होई.
वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी उत्तर रात्री योगवसिष्ठातील चित्ताकाशाचे निरुपण निघाले. त्यातील आशय असा होता की, व्यास, नारादासारखे मोठमोठे महात्मे चिदाकाशाच्या दृष्टीने एकच आहेत.
चित्ताकाशाच्या दृष्टीने मात्र त्याच्यात भेद दिसतो. यावर काही लोकांनी शंका घेतली. जर चिदाकाश दृष्टीने सर्व महात्मे एक आहे तर, विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली आणि वसिष्ठांनी केली नाही हा भेद त्यांच्या सामर्थ्यात का दिसतो?
महाराज म्हणाले, हा भेद त्यांच्या तपसमर्थ्यात होता. ब्रह्मज्ञान सगळ्यांचे सारखेच असते. ब्रह्मज्ञाना पुढे तप सामर्थ्यांचे काहीच महत्त्व नाही.
हे निरूपण सांगून झाल्यावर महाराजांनी विचारले, यावेळी तुम्ही चिदाकाशा स्थितीमध्ये असल्याने तुम्हाला प्रत्येक महात्म्यात भेद दिसतो का? ते सांगा.
ऐकून श्रीनिवास शास्त्री व इतर मंडळी आपल्या मनात समजले की, आपण व्यासमुनी व ऋषींच्या दर्शनाची इच्छा करीत होतो, ती आज महाराजांच्या दर्शनानेच सफल झाली. आता इतर कोणत्याही महात्म्याच्या दर्शनाची इच्छा शिल्लक राहिली नाही. निरूपण आटोपल्यावर महाराज म्हणाले, आजचे निरूपण मी व्यास होऊनच सांगितले असे समजा.
महाराज म्हणाले, व्यास हेच सर्वधर्म प्रवर्तक आहेत. पुढे म्हणाले, महाभारतात शांतीपर्वोंतर्गत मोक्षधर्मपर्वोत अशी कथा आहे की, सृष्टीच्या निर्मितीच्या पूर्वी, भगवान नारायणापासून अपांतरम नावाचे ऋषी, वेदांचे आचार्य उत्पन्न झाले. त्यांनी नारायणांना वर दिला की, कली प्राप्त होईल तेव्हा तुझे रुप कृष्ण म्हणजे काळे होईल .त्यावेळी तू नाना देशात, नाना कर्माचा प्रवर्तक होशील व तू अनेक कर्मे करशील. त्या सर्व कर्माने तु लोकांना तारण्याचा प्रयत्न करशील. याप्रमाणे भगवान अपांतरम मुनी हे सत्यवती सुत व्यास झाले. तेच कलीत अनेक प्रकारच्या कर्माचे व ज्ञानाचे प्रवर्तक होतात.
हा चित्ताकाशाचा प्रकार इकडे महाराज मंडळींना पटवून देत होते, त्याचवेळी तिकडे रामचंद्र गंगाधर भागवतला स्वप्नदृष्टांताने त्याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर दिसून राहिले होते.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
!!! मधुराद्वैताचार्य गुलाब महाराज !!!
भाग - २१.
रामचंद्र गंगाधर भागवत अमरावतीला एक नंबर शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. १९०३ साली उमरावतीत प्लेग झाल्यामुळे शाळा बंद झाल्या. रामचंद्र कायरास राहायला गेले. तीन महिने ते कायरासातच होते. त्यावेळी त्यांची व गुलाब महाराजांचे ओळख नव्हती की, काही माहिती नव्हती. एवढेच नव्हे तर त्यांचे नाव सुद्धा माहित नव्हते. त्यांनी एक महिना मित्रांबरोबर गीता चर्चेत घालवला. श्रीभागवत सप्ताहाची दोन पारायण ऐकली. त्यानंतर पांडव प्रताप वाचला. ती रात्री त्यांची फारच आनंदात गेली.
दुसऱ्या दिवशी त्यांना एक चमत्कारिक स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना व्यासांचे दर्शन होऊन, गीतेतला शेवटचा श्लोक पठण करण्याची आज्ञा झाली. डोळे उघडून पाहिले तर ती मूर्ती नुकतेच उगवलेल्या सूर्याच्या कोमल प्रतिबिंबात अंतर्धान पावली. त्यादिवशी पासून त्यांच्या वृत्तीत फरक पडत गेला.
त्यानंतर १९०४ मध्ये उमरावतीस एकटेच येऊन मित्राच्या घरी राहू लागले. त्या दिवशी वैकुंठचतुर्दशी सोमवारच्या पहाटे त्यांना गुलाब महाराज दिसले. आश्चर्य म्हणजे स्वप्नात दिसलेले श्री व्यासमुनी गुलाब महाराजांच्या ठिकाणी दिसले. असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. श्रीव्यासमहर्षींनी गुलाब महाराजांच्या हवाली करण्याकरता पुन्हा दर्शन दिले. त्यांनी उपदिष्ट सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला श्लोक श्री गुलाब महाराजांच्या पदकमलावर दाखविला आणि दोघेही अंतर्धान पावले.
त्यावेळी महाराज मुळे मास्तरांच्या घरी राहत होते. रामचंद्र लवकर उठून प्रातःर्विधी आटोपली. व तडक महाराजांकडे गेले. सकाळची वेळ असल्यामुळे, सर्वजण निजलेले होते. महाराजही पांघरुण घेऊन निजलेले होते. ते बराच वेळ महाराजांच्या पायाशी उभे राहिले. फक्त श्रीनिवास शास्त्रींना ते येऊन गेल्याचे माहित झाले. ते परत आपल्या बिर्हाडी आले. त्या दिवसापासून पुढे तो दिवस गुरुप्रसादाचा समजून उपास करू लागले.
या सर्व चमत्काराबद्दल त्यांनी कधीच कोणाला सांगितलं नाही. पुढच्या वर्षी १९०५ साली शुक्लेश्वर वाठोड्याला कात्यायनी व्रताच्या वेळी त्यांची व महाराजांची गाठ पडली. २-४ दिवस राहण्याचा योग आला. त्यावेळी श्रीनिवासशास्त्री कडून या गोष्टीची उकल झाली. भगवान वेदव्यास आणि शंकराचार्यांच्या भेटीचा प्रसंग शांकर दिग्विज्यातील सातव्या अध्यायात वर्णन केला आहे. त्यात व्यास महर्षींनी शंकराचार्यांना उद्देशून म्हटले..
त्वमस्मदादेः पदवीं गतौऽभूरखण्डपाण्डीत्यमबोधयन्ते
ह्या व्यास वचनाच्या वृत्तांतावरुन श्री गुलाब महाराजांच्या योग सामर्थ्याची जाणीव होते. कौतुक वाटते.
महाराजांच्या सहवासात अशा चमत्कारांच्या अनुभूतीने निष्कटक व सोज्वळ बनलेल्या परमार्थ पथावरून भक्त व शिष्य मंडळी मार्ग आक्रमणु लागले.
उमरावती पासून ८ कोसावर, पायोष्णीच्या काठी शुक्लेश्वर वाठोडा म्हणून एक अतिशय रम्य स्थान आहे .तिथे कार्तिक वद्य एक, गुरुवारपासून महाराजांनी कात्यायनी व्रताला सुरुवात केली. त्यावेळी महाराज सोबतच्या मंडळींना म्हणाले....
गडे होऽ! आपण सर्व गोपी आहोत अशी भावना करा. आणि श्रीमद् भगवतात वर्णन केल्याप्रमाणे, गोप कुमारींनी कात्यायनी व्रत करून श्रीकृष्णाच्या रास क्रीडेचा अधिकार मिळवला होता. तसा आपण काही मिळवू या....
अशा प्रेमळ वचनांनी त्यांनी भक्तांना प्रोत्साहन दिले. महाराजांनी व्रतासंबंधी पूजा सांगण्याकरिता वेद. गोविंद शास्त्रींची नेहमीसाठी योजना केली होतीच.
व्रतसंबंधी पूजा, भागवत, ज्ञानेश्वरीचे श्रवण, इत्यादी नित्य कार्यक्रम आटोपल्यानंतर, नेहमीचा स्वच्छास्त्र निरुपणाचा व भागवत गुण वर्णनाचा कार्यक्रम महाराज रात्रंदिवस करीत असत. उलूख बंधन, यमलार्जुनोध्दार अख्याने इ. कार्यक्रमे होत होते.
अमरावतीच्या मंडळीपैकी वासुदेव मुळेंना नागपूरला नील सिटी स्कूलमध्ये नोकरी मिळाली. ते निघून गेले. श्रीनिवास शास्त्री व इतर मंडळी दर शनीवारी वाठोड्यास येत. व सोमवारी सकाळी उमरावतीला परत जात. या मंडळीस रागनिवृत्ति सद्गुरु भजनाचे तत्व कळावे या उद्देशाने त्यांना पत्र पाठवून शिक्षण देण्याचा उपक्रम महाराजांनी सुरू केला. त्यांनी श्रीनिवासांना पाठवलेल्या दोन पत्र पैकी पहिल्या पत्रात चितैकाग्रय व व सत्संग यांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या पत्रात परमार्थ शिक्षण मीमांस आहे. महाराजांच्या व श्रीनिवासांचा नेहमी वाद होत असे की, परमार्थात प्राथमिक शिक्षण वेदांताचे द्यावे की संख्याचे द्यावे? तोच निर्णय करण्याकरता महाराजांनी हे दोन पत्र लिहिले आहे. या पत्रात महाराज म्हणतात की, प्राथमिक शिक्षण वेदांताचे न देता सांख्याचेच का द्यावे. याबद्दल महाराज म्हणतात....
" शिक्षण म्हणजे सुसंस्काराचे दान करणे होय!"
महाराजांनी शिक्षणाचे तत्व सांगून, पुढे नुसत्या वेदांताने परोक्षज्ञान कसे होते? शिक्षण निवृत्तीपूर्वक अपरोक्षज्ञान होण्यास सांख्याद्वारा वेदांत शिक्षणाची किती आवश्यकता आहे हे महाराजांनी उदाहरणासह सिद्ध केले.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा