!!! बप्पा रावल !!!
भाग - २०.
मेवाड नरेश आश्चर्याने समोर उभे असलेल्या त्या योद्धा कडे पाहत होते. ते होते नागादित्य! हे कसे शक्य आहे? भुजंनाथने तर सूचना पाठवली होती की, दोघे भाऊ महिष्कपुरकडे गेले होते. मानमोरीला अचंभीत बघून, नागादित्य म्हणाले, काय झाले मेवाड नरेश मानमोरी? भुजंगनाथने आपल्याला चुकीची सूचना दिली होती ना? म्हणजे? भुजंगनाथ पकडला गेला तर?
बरोबर ओळखले नरेश मेवाड. तुम्हाला काय वाटले, आमच्या अनुपस्थितीत कपटाने विन्यादित्य महाराजांना घायाळ करून आमच्या सेनेचे मनोबल तोडण्यात सफल व्हाल? इथेच चुकलात. आणि आता माझ्यासमोर उभे आहात. नरेश मानमोरी, दहा वर्षांपूर्वी परमारांनी आमच्या पूर्वजांबरोबर जे वर्तन केले ते आम्ही विसरलो नाही. असे म्हणून, नागादित्य मानमोरी कडे भाला घेऊन धावले. दोघांमध्येही भीषण युध्द जुंपले. वार प्रतिवार होऊ लागले. आणि मानमोरी मुर्च्छित होऊन जमिनीवर कोसळले. नागादित्यांना आपल्या परिवारांच्या मृत्यूचे स्मृती झाल्यावर तत्क्षणी मानमोरींची हत्या करायची तीव्र इच्छा झाली. ते संभ्रमित बघून, शिवादित्य म्हणाले, नागादित्य कशाचा विचार करतोस? या नराधमाचा तात्काळ वध कर.
नागादित्य म्हणाले, नाही भैया! हा एक तर मुर्च्छित आहे. मुर्च्छित असताना वध करणे योग्य नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे, याने चालुक्यराज विन्यादित्याशी कपट केले. हा त्यांचा अपराधी आहे. तेच याच्याबाबत निर्णय घेतील. मानमोरीला बंदी केल्या गेले. आणि युद्धबंदीचे बिगुल वाजवले.
संध्याकाळच्या वेळी चालुक्यराज आपल्या शिबिरात मानमोरीच्या कपटाबद्दल विचार करीत होते, तोच त्यांचे वडील विक्रमादित्यायांनी प्रवेश केला. अचानक त्यांना आलेले बघून, विन्यादित्य चकित झाले. म्हणाले, पिताजी, आपण? इथे? आपल्या जखमा अजून भरल्या नाहीत. आपल्याला आरामाची आवश्यकता आहे.
पुत्रा, यावे लागले. परिस्थितीमध्ये खूप मोठे परिवर्तन झाले आहे. तुझ्या एका निर्णयाने परिस्थिती बदलू शकते. समजलं नाही पिताजी!
मेवाड नरेशने आपल्याबरोबर एवढे मोठे कपट केले तरी त्यांना प्राणदान द्यावे लागेल. हे आपण काय म्हणता? आपल्याला माहित आहे, त्याने माझ्या मूर्च्छितावस्थेत हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. होय माहित आहे. तरीही? पिताजी, एक वेळ त्यांनी माझ्याबरोबर केलेले कपट विसरेनही. परंतु त्या दोन गुहिलवंशी वीरांना काय उत्तर देऊ? त्यांना कितीतरी वर्षानंतर आपल्या परिवारांच्या हत्येचा बदला घेण्याचा अवसर प्राप्त झाला. त्यांनी या दिवसाची किती वर्षापासून आतुरतेने प्रतीक्षा केली. नागादित्यांना तर रणातच मानमोरीची हत्या करण्याची संधी उपलब्ध होती. परंतु माझा अपराधी म्हणून माझ्या सन्मानार्थ, मेवाड नरेशला माझ्या निर्णयावर सोपवले. पिताश्री! आपला हा आदेश मला मोठा धर्म संकटात टाकत आहे.
पुत्रा, विन्यादित्या समजण्याचा प्रयत्न कर. एक फार मोठे विकराल संकट भारतवर्षाकडे येत आहे. आम्ही जर दुर्लक्ष केले तर, परिणाम फार घातक, भयंकर होईल. तुला तुझ्या मित्रांनाही या समर्थनासाठी समजावावे लागेल.
रणांगणातील मोकळ्या मैदानात बेड्यांमध्ये जखडलेला मानमोरीला व त्याचे मुख्य सेनापती तसेच चालुक्यांशी द्रोह करणाऱ्या चालुक्य सेनानायक भुजंगनाथला शेकडो चालुक्य सेनेच्या घेरात आणल्या गेले. शिवादित्य आणि नागादित्य कृध्द नजरेने माननोरीकडे पाहत होते.
तेवढ्यात शेकडो सैन्याच्या जयघोषात विन्यादित्य आणि विक्रमादित्य आले. विन्यादित्य मानमोरीसमोर येऊन, आपल्या गुहिलवंशी मित्रांकडे दृष्टीक्षेप केला. मानमोरिला दंडीत करण्याच्या प्रतीक्षेत व्यग्र दिसत होते. विन्यादित्य भयभीत भुजंगनाथला म्हणाले, भुजंगनाथ तुमचा अपराध तर मेवाड नरेश पेक्षाही संगीन आहे. स्वजनांशी द्रोह करण्याची एकच शिक्षा.. देहदंड! असे म्हणून तलवारीच्या एकाच घावात भुजंगनाथचे शिर धडापासून वेगळे केले.
नंतर चालुक्यराज मानमोरी समोर येऊन म्हणाले, मेवाड नरेश फार भयभीत दिसताहात. वार करण्याआधी विचार केला नाही, तर आता शिक्षेची भीती का वाटावी? मग विलंब कशाला चालुक्यराज? उचला तलवार आणि करा मला समाप्त.
विन्यादित्य विवशतेने बांधले असल्यामुळे आपला क्रोध अंदर दाबत तलवारीच्या एका धावात मानमोरीच्या बेड्या तोडल्या. म्हणाले, मानमोरी, मला यावेळी राष्ट्र आणि संस्कृतीच्या सुरक्षिततेने विवश केले. अन्यथा या क्षणी तुमचे कटलेले मस्तक जमिनीवर पडले असते.
विनिदित्याचे वर्तन पाहून दोघे भाऊ हतप्रभ झाले. मानमोरीही आश्चर्याने उभे राहिले. विचलित शिवादित्य म्हणाले, महाराज! आपण हे काय करताहात? या भयंकर अपराध्याला जिवंत कसे सोडू शकता?
विन्यादित्य त्यांना समजत म्हणाले, बंधूंनो! मला माफ करा. पण सध्या परिस्थिती अशी आली आहे की, या पाप्याला जिवंत सोडण्यासाठी मजबूत झालो. असे काय झाले महाराज?
अरब सेनेने सिंध देशाला घेरणे सुरू केले आहे. मागच्या कित्येक वर्षापासून स्वबळावर सिंध राज दहिरसेनने त्यांना रोखले होते. परंतु आता ते सर्व किल्ले हरले आहेत. अरबी सिंधवर हावी होत आहे. त्यांनी मेवाड सहित अनेक राज्यांना मदतीसाठी संदेश पाठवले आहेत. परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सिंध जर पराजित झाला, तर अरबीयांना भारत वर्षात कारवाया करण्याचा मार्ग नेहमीसाठी मोकळा होईल. आपली अर्धी सेना तर पल्लवांनी दिलेली आहेच. ती दहा वर्षांनी परत करावी लागणार आहे. आतापर्यंत आपण महिष्कपुरवर ताबा मिळवू शकलो नाही. आणि तुमची मनीषा अभेद्य चितोड किल्ला घेण्याची आहे. कदाचित मेवाड नरेश कडून प्राणाच्या बदल्यात चितोड किल्ला प्राप्त केला, तरी ती कायरता होणार नाही? समजा असे केले तरी मेवाड सेना पूर्ण मनोयोगाने आपल्या झेंडा खाली युद्ध करतील? हे सर्व एकूण आपल्या क्रोधावर काबू करून नागादित्य म्हणाले, भैय्या महाराजांचे बोलणे ऐकून यावेळी आपली वैयक्तिक दुश्मनी विसरुन राष्ट्ररक्षा करणे अनिवार्य आहे. मेवाडचा कुणी वारस नसल्यामुळे मानमोरीच्या निधनानंतर सत्तेसाठी मेवाड मध्ये झगडे सुरू होतील. आणि अनेक तुकड्यात अखंड मेवाड वाटल्या जाईल.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
!!! बप्पा रावल !!!
भाग - २१.
नागादित्यांनी समजाविल्यावरही शिवादित्यांचा राग शांत झाला नाही. नागादित्य पुन्हा समजावत म्हणाले, भैय्या, यावेळी आपली मजबुरी आहे. इतर गोष्टी पेक्षा राष्ट्रहित महत्त्वाचे आहे.
विन्यादित्य मानमोरीला म्हणाले, जर सिंधचा पराभव झाला, तर अरबांच्या तडाख्यातून आपला चितोड पण सुरक्षित राहणार नाही. मानमोरी म्हणाले, चाणक्यराज, आमची फिकीर करु नका. पूर्ण दुनियेची ताकद एक झाली तरी, चितोडचा किल्ला भेदू शकत नाही. असे असले तरी, आपण राष्ट्रासाठी सर्वात मोठ्या शत्रूला जीवदान देताहात, तर आम्ही भारताच्या सुरक्षेतेसाठी सिंधुराज दहिरसेनची सहाय्यता करू. परंतु माझी एक अट आहे. जोवर मेवाड सेना या युद्धात असेल तोवर चालुक्यसेना भाग घेणार नाही. विन्यादित्त्यांना क्रोध तर भयंकर आला होता. पण पित्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून शांत राहण्याचा इशारा केला. राष्ट्र सुरक्षा पुढे विन्यादित्त्याने आपल्या अंदर भडकलेल्या अग्नीला पिऊन टाकले.
विन्यादित्यांच्या आदेशावरून, बाकी कैद्यानांही बंधन मुक्त केले. मेवाड नरेश सैन्यसह निघून गेले.
महाराज विनिदित्यांनी बदामी मध्ये दोन दिवस विश्रांती घेतल्यावर पूर्ण महिष्कपुरावर ताबा घेण्याची योजना बनवणे सुरू केले. या तीन वर्षात दोन्ही गुहिल बंधूने जवळजवळ संपूर्ण महिष्कपुरावर चालुक्यराज्यचे अधिपथ्य स्थापित केले.आता शेवटी भोजकश आपल्या साधीन करण्यासाठी नागादित्याने भोजकशच्या सीमेवर आपली छावणी टाकली. संधी प्रस्ताव घेऊन भोजकसचा राजा भुरीश्वावाकडे पाठवलेला दूत परत आला. त्याने सांगितले, भुरीश्वरांना संधी प्रस्ताव मान्य नाही. ते युद्धास सज्ज आहे.
सकाळ होताच, भिषण युध्दाला सुरुवात झाली. काही वेळात मेवाडचा ५०० हत्तींचा दल भोजकसच्या सेनेच्या सहाय्यासाठी पोहोचला. विशेष म्हणजे या तुकड्याचे नेतृत्व एक युवती हत्तीवर स्वार होऊन करत होती. बाणांचा वर्षाव तीच करत होती. तिला अडवणे आवश्यक होते. नागदित्यांनी फार मोठे धाडस, प्रयत्न करून शेवटी त्या युवतीला हत्तीवरुन खाली पडण्यात यशस्वी झाले. तिच्या गळ्याला तलवारीचे टोक लावून शरण येण्यास सांगितले. पण अत्यंत स्फूर्तीने ती नागदित्यांशी भिडली. दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले. नागदित्यांनी शेवटी तिला शरण येण्यास भाग पाडले. शेवटी भूरीश्वराने शरणागतीचे पांढरे निशाण फडकवले. ती युवती भोजकशची राजकुमारी, चारूमित्राची बाल सखी, मेवाड नरेश मानमोरीची धाकटी बहीण मृणालिनी होती. हा गजदल मृणालीच्या अख्त्यारीत होता. मित्रता निभवण्याच्या उद्देशाने ती युद्धात उतरली होती. आणि याच युद्धात मानमोरीची बहीण नागदित्याच्या प्रेमात पडली. व दोघांच्या संमतीने एकमेकांना स्वीकार केले. परंतु मेवाड सेना भयभीत झाली. राजा मानमोरी या पराभवाने आणि या प्रसंगाने काय उत्पाद माजवेल याची धास्ती वाटली.
चितोडगडचा दरबार भरला होता. भोजकश मध्ये घडलेल्या हकीकतेचे बातमी पत्र घेऊन, संदेश वाहक दरबारात आला. पत्र वाचताच मानमोरीने त्या संदेश वाहकाचा गळा चिरला. सारी सभा स्तब्ध झाली. मानमोरीला आवरायचे साहस कोणी करू शकत नव्हते. त्या क्रोधाच्या भरात मानमोरीने आपल्या वृद्ध महामंत्री जयसंघाला आज्ञा केली. मृणालिनीला पत्र पाठवा. कळवा की, जर तिने त्या गृहिलशी विवाह केला, तर तिच्यासोबत तिच्या त्या जीवनसाथीचाही अंत माझ्या हाताने करीन.
जलसंघ केवळ महामंत्रीच नव्हते तर मानमोरीचे सलाहाकारही होते. त्यांनी एकांतात समजावले. आणि म्हणाले, मृणालिनीचा स्वभाव आपण ओळखता. त्या कोणत्याही प्रकारे विवाह केल्याशिवाय राहणार नाही. स्थितीची नजाकता बघा. हा एक अवसर आहे, शत्रुला आपले प्रमुख शस्र बनवण्याचे. आणि हळूहळू त्यांना जलसंघ योजना सांगू लागला.
काही दिवसांनी चितोड दरबारात गुहिलवंशी नागदित्य आणि मृणालिनीला बोलावण्यात आले. दोघेही आल्यावर, मानमोरी म्हणाले, मेवाड राजकुमारीचा विवाह चालुक्याच्या एका साधारण सामंताशी, ज्याच्याजवळ थोडीही भूमी नाही अशाशी करणे योग्य आहे का?
नागदित्य आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवत म्हणाले, महाराज, आपल्याला काय म्हणायचे ते स्पष्ट बोला. मानमोरी म्हणाले, तुमचा दोघांचा विवह करण्याचा निर्णय पक्का झालाच आहे तर, तुमच्या पूर्वजांची भूमी नागदा तुम्हाला देऊ इच्छितो. तिथे माझ्या बहिणीबरोबर सुखाने राहून, नागदा नरेश नागदित्य म्हणून शासन करा.
जर माझा प्रस्ताव स्वीकार नसेल, तर मृणालिनीला घेऊन तुम्ही जाऊ शकता. पण यानंतर मी तिचे कधीच तोंड बघणार नाही. नागदित्यला संभ्रमित बघून, मानमोरी म्हणाले, मी तुम्हाला नागदा काही लालसेने किंवा दान देत नाही, तर मला तुमची आवश्यकता आहे. मागच्या दोन वर्षापासून नागदात भिल्लांचा उपद्रव वाढला आहे. प्रजा त्रस्त झाली आहे. त्यासाठी मला चांगल्या योध्याची आवश्यकता आहे. जे त्या भिल्लांना समाप्त करून तेथील प्रजेचे रक्षण करेल.
नागादित्य म्हणाले मला थोडा वेळ द्या. मी सध्या बदामीला जाऊ इच्छितो.
नागादित्य, शिवादित्य व चालुक्यराज नदीकाठी मोठ्या वृक्षा खाली बसले होते. शिवादित्य म्हणाले, ती राजकन्या पराजित झाल्यामुळे तुला आपल्या रूपाच्या मोहाजाळ्यात अडकवले. ही दोघा बहिण भावाची मिलीभगत आहे. आपल्याला महिष्कपुर पासून हा दूर करून चालुक्यांना जिंकण्याचे षडयंत्र आहे. नागादित्याने आशेने चालुक्यराजकडे बघितले. पण त्यांनाही नागदित्यांचा हा प्रस्ताव आवडलेला दिसला नाही. नागादित्य म्हणाले, भैय्या, राजकन्या माझ्यावर आशा लावून बसली आहे.
शिवादित्य म्हणाले, जर तिचे खरंच तुझ्यावर प्रेम असेल, काही मनात कपट नसेल, तर तिला म्हण की, आपला परिवार सोडून तुझ्याबरोबर महिष्कपुरात येऊन रहा. तुला का मेवाडला यायला भाग पाडत आहे?
मी असा निर्णय घेतला, तर ती आपल्या भावाला कायमची अंतरेल. शिवादित्य रागाने म्हणाले, तुझा निर्णय झालाच आहे, तर आमच्याकडे कशाला आलास? जा जाऊन परमारांचा जावई हो! त्यांनी आशेने विन्यादित्याकडे बघितले. हात जोडून म्हणाले, आपण केवळ आमचे राजाच नाही तर अन्नदाता पण आहात. आपण जो निर्णय द्याल तो मी मान्य करीन. तेवढ्यात तिथे विक्रमादित्य घेऊन गर्जून म्हणाले....
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👍
उत्तर द्याहटवाGood 😊
उत्तर द्याहटवा